करोना परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षा लांबणीवर गेल्यात अन् यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे अधिकारी बनण्याची महत्वकांक्षा, लागणारा वेळ, येणारे नैराश्य हा विषय समोर आला आहे.
अनेक जण म्हणत आहेत, स्पर्धापरीक्षा म्हणजे सर्व काही नाही, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी इतर क्षेत्रातही उत्तम काम करू शकतो, स्पर्धा परीक्षेत तीन ते पाच वर्ष यापेक्षा जास्त काळ देऊ नये आणि अनेक काही… खरंच यावर आपण बोलायला हवं.. कारण एक विद्यार्थी वकिलीचा अभ्यास करणारा पुढे जाऊन चांगला वकील बनू शकतो किंवा बिझनेस मॅनेजमेंट शिकून कोणता विद्यार्थी मोठ्या हुद्द्यावर काम करू शकतो किंवा बीएससी ऍग्री करून कोणी शेतीमध्ये आधुनिकता आणू शकतो किंवा कोणी मेडिकल चा विद्यार्थी चांगला डॉक्टर बनून कोणाचा जीव वाचवू शकतो, असे सर्वजण(समाज सेवा का आभासी प्रसिद्धी) यासाठी स्पर्धा परीक्षेच्या वर्तुळात गोल गोल स्पर्धा करत कितीतरी वर्ष अभ्यास करत आहेत नक्कीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आयुष्यात खूप काही शिकवून जातो, आयुष्याला एक वेगळा आयाम देतो, आकार देतो परंतु स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे कधीच शिकवत नाही.. स्पर्धा परीक्षा म्हणजेच सर्व काही नाही, सर्वस्व नाही.
मुळातच प्रत्येक माणूस, प्रत्येक विद्यार्थी आपल्या यशासाठी झटत असतो, प्रयत्न करत असतो. प्रत्येक विद्यार्थी हाच विचार करत असतो की, बाकीच्यांना जमले नाही याचा अर्थ असा नाही की मला ही जमणार नाही, मी जास्त अभ्यास करेल २- एक पुस्तके वाचेल, स्टेट बोर्ड चे पारायण करेल जे फक्त 10वी syllabus कव्हर करतात आणि पदवीस्तर स्पर्धा परीक्षा यशस्वी होईल, बाकीच्यांनी केलेल्या चुका मी करणार नाही आणि यशस्वी होईल आणि या विचारात जेव्हा आपण 3,5,7 वर्ष अभ्यास करतो आणि अपयशाचे धक्के खातो तेव्हा एक मानसिकता तयार होते “खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी” आता मी माझ्या आयुष्याची उमेदीची 5-7 वर्ष स्पर्धा परीक्षेत वाया घालवलेली आहेत माझ्या गावाच्या पंचक्रोशीत सर्वांनाच माहित आहे की हा मुलगा भावी तहसीलदार आहे ,भावी PSI आहे आणि हेच ती गावच्या पारावर बसणारी लोक ज्याचें आपण अनाहूतपणे टेन्शन घेतो आणि स्वतः स्वतःची एक व्याख्या बनवतो आता इथून मागे फिरलो तर मी अपयशी ही सर्व लोक मला अपयशी समजतील आयुष्यात वयाच्या तिसाव्या वर्षीच मी काहीच करु शकलो नाही असं समजतील आणि आयुष्यभरासाठी अपयशाचा शिक्का लावतील म्हणून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या वर्तुळात फिरत राहतो. या मधील काही मुद्दे मी अधोरेखित करतो 1. समाज काय म्हणेल त्यांच्या दृष्टीने मी अपयशी ठरेल. आपण दुसरे काय म्हणतील, याचा विचार करणे प्रथम सोडायला हवा, आपण स्वतः इतरांना सांगायला हवे स्पर्धापरीक्षा म्हणजे सर्व काही नाही आणि स्पर्धा परीक्षेतील यश म्हणजे सर्व नाही आणि अपयश म्हणजे ही सर्व नाही गावातील लोकांचा(समाजाचा) दृष्टिकोन एका दिवसात बदलणार नाही पण आपण तो प्रयत्न करायला हवा 2. पालकांनी सुद्धा हे समजायला हवे स्पर्धा परीक्षेतील यश म्हणजे सर्व काही नाही जगात अनेक इतर क्षेत्र आहेत, स्पर्धा परीक्षा सोडून जेथून यश, पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान सर्व काही मिळू शकते. आपणही पाल्यांना अधिकारीच हो हे न म्हणता त्याचा कल कुठे आहे हे समजून त्यास दुसऱ्या क्षेत्राकडे किंवा दुसऱ्या क्षेत्रातील opportunity सांगायला हव्यात. 3.मी (विद्यार्थी) पाच वर्षानंतर स्पर्धा परीक्षेतून दुसऱ्या क्षेत्राकडे वळालो तर मी अपयशी नाही हे समजून घ्यावे, दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय विद्यार्थी कधीही घेऊ शकतो, आयुष्यात कोणताही निर्णय हा योग्य नसतो त्यास कष्ट करून योग्य, बरोबर बनवावा लागतो, हे नेहमी लक्षात ठेवा निर्णय वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार बदलत असतात आणि बदलावे लागतात त्यामुळे स्पर्धा परीक्षेतून दुसऱ्या क्षेत्रात जाणे निर्णय कधीच चुकीचा किंवा बरोबर नसतो तो आपल्याला आपल्या कष्टांवर बरोबर की चूक आहे ठरतो.
मी नेहमी सांगतो Plan-B म्हणजे अपयश नव्हे आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जेव्हा एक रस्ता बंद असताना दुसऱ्या रस्त्याने पुढे जाणे, यशस्वी होणे म्हणजे प्लॅन बी
स्पर्धा परिक्षेमधून दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय याकडे सर्व विद्यार्थ्यांनी, मार्गदर्शकांनी, पालकांनी आणि समाजातील सर्व लोकांनी पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहायला हवे. तो अपयशी झाला म्हणून दुसरीकडे जातोय असा विचार करायला नको किंबहुना दुसऱ्या क्षेत्रात त्याच्यासाठी याहून मोठी यशाची संधी असेल आणि तो दुसऱ्या क्षेत्रातूनही समाजाचे हित करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो हा दृष्टीकोन आपण सर्वांनी ठेवायला हवा.
डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर
स्पर्धा परीक्षा: इतर क्षेत्र एक योग्य निर्णय? का अपयश?
06
Dec